यावल, प्रतिनिधी । संपूर्ण देशात सध्या मागील एक महिन्यापासून कोरोना या घातक अशा संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून उद्या २५ एप्रिलपासून समस्त मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे. या र्श्वभूमीवर आज यावल येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, यावल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष इक्बाल खान नसीर खान, नगरसेवक सय्यद युनूस सय्यद युसुफ हाजी, असलम खान, हाजी गफार शाह यांच्यासह शहरातील विविध मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांच्यासह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कोणीही सामूहिक नमाज पठण करणार नाही तसेच रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांनी रोजा इफ्तारसाठी एखाद्या गच्चीवर किंवा दुकानात किंवा खाजगी ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमू नये. त्याचप्रमाणे रोजा इफ्तार सोडवण्यासाठी लागणारे फळ व इतर साहित्य आधीच घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. या वरिष्ठपातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करावे अशा सूचना पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी यांनी केल्यात. यावेळी ज्येष्ठ शांतता समिती सदस्य हाजी शब्बीर खान यांनी पोलीस प्रशासनाला संपूर्ण रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम समाज बांधवांकडूनकडून सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली. तसेच त्यांनी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी ३ महिन्याच्या कालावधीत या संकटसमयी विविध अडचणींवर मात करून केलेल्या कार्याचे विशेष करून कौतुक केले.