यावल, प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालय यावल सातोद रोडवर नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर त्या परिसरातील विविध ठिकाणी नागरिकांनी आपली दुकाने थाटण्यासाठी बेकादेशीर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करण्यास सुरुवात केली असून या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
यासंदर्भातील वृत्त असे की, यावल शहरातील सुमारे १०० वर्ष जुन्या तहसील कार्यालयाचे स्थलांतर सातोद मार्गावरील सात महिन्यापूर्वी बांधलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये झाले असून यामुळे जुन्या तहसील कार्यालयाच्या समोर असलेली विविध झेरॉक्स दुकाने आधी व्यवसायियांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे काही दुकानदार आपली दुकाने नव्या तहसील इमारतीच्या अवतीभवती रहावी या हेतूने मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. यातील काही व्यवसायिकांनी तर या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या समोरील परिसरात अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. या शाळेसमोरील अतिक्रमण वाढल्यास मुलांची शाळाही अदृश्य होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक जीवनावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय यावल शहरातील त्या जुन्या इमारती समोर ज्या पद्धतीने अतिक्रमणधारकांनी ज्या पद्धतीने तहसीलला विळखा घेतला तशी परिस्थिती या नवीन तहसीलच्या प्रशासकीय इमारत समोर निर्माण होऊ नये याकरिता यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दक्षता घेऊन या अरुंद मार्गावर शाळेच्या आवारात समोर व परिसरात होत असलेल्या अतिक्रमण तात्काळ थांबवावे अशी मागणी होत आहे.