यावल, प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘सॉफ्ट स्किल व क्रिएटिव थिंकिंग इन केमिकल अॅड फिजिकल सायन्सेस’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय वेबिनार क.ब.चौ.उ.म.विध्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र.कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्या प्रेरणेने घेण्यात आला. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे मानद सचिव निलेश भोईटे होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.पी.पी माहुलीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन नीलकंठ काटकर, व्हाईस चेअरमन विरेंद्र भोईटे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात निलेश भोईटे यांनी कोविड १९ प्रादुर्भाव असताना ग्रामीण भागातील महाविद्यालयाने असा स्तुत्य उपक्रम राबवला. तसेच ह्या वेबिनार मुळे रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञ व विद्वान लोकांना आपले नावीन्यपूर्ण कल्पना व विचार मांडण्याची संधी मिळाली असे मत मांडले. उद्घाटनपर भाषणात प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही सॉफ्ट स्किल व क्रिएटिव्ह थिंकिंग यावर भर देण्यात आला आहे. कौशल्य विकसित करण्याचा दृष्टिकोण ऑनलाईन टिचींग व लर्निंग या वर्तमान परिस्थितीत खूप मोलाचे आहे. तसेच आपल्या विद्यापीठातही वरील विषयावर भर देण्यात येणार आहे,असे सांगितले. या वेबिनारमध्ये डॉ. गजानन राशीनकर (रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांनी ‘नेट-सेट तयारी व मार्गदर्शन’ या विषयावर मौलिक विचार मांडले.नेट सेटची तयारी कशी करावी हे सोप्या व सरळ भाषेत त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात प्रा.के.एम. बोरसे (एस.एस. वी.पी.एस. महाविद्यालय धुळे) यांनी ‘स्पेक्ट्रोस्कॉपी स्टडी’या विषयावर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी मौलिक मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात आर. सी. पटेल महाविद्यालय,शिरपूर येथील प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांनी ‘क्रिएटिव्ह थिंकिंग फाॅर रिचर्च इन फिजिकल सायन्स’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच नवीन तंत्रज्ञान कशा पद्धतीने समाजासाठी उपयोगी राहील यावर भर दिला. शेवटच्या चौथ्या सत्रात डॉ. विजय चौधरी (एन.सी.एल.पुणे) यांनी ‘ॲल्युमिनियम फ्यूअल सेल: सोल्युशन टु एनर्जी डिमांड’ या विषयावर मार्गदर्शन केले.सदर राष्ट्रीय वेबिनार साठी देशभरातून ५५० सदस्यांनी नोंदणी केली होती व जवळपास ३५० ते ४०० सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ए.एन.सोनार (रसायनशास्त्र विभाग, नाईक महाविद्यालय रावेर) हे होते. कार्यक्रमाचे मनोगत तामिळनाडूतील पी.मारी मुक्टु व डॉ.दयाघन राणे यांनी व्यक्त केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.आर. डी. पवार व डॉ.एच.जी.भंगाळे यांनी केला. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी केले तर आभार प्रा.एस.आर. गायकवाड यांनी मांनले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील, प्रा.डॉ.एस.पी.कापडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा.ईश्वर पाटील, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,प्रमोद कदम,ए.डी. पाटील, विनय पाटील,उमेश महाजन यांनी कामकाज पाहिले.