यावल प्रतिनिधी । येथील महाविद्यालयात ‘करिअर मार्गदर्शन व समुपदेशन समिती’तर्फे नुकतेच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील होते.
याप्रसंगी योग शिक्षिका सुरेखा काटकर यांनी ‘योगाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, योग म्हणजे जुळणी. योगामुळे शरीर आणि मन तसेच आत्मा व परमात्मा यांची जुळणी होत असते. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक कारणांनी तणाव येतो. योगामुळे ताण कमी होतो. शरीरातील विजातीय घटक बाहेर पडतात. हार्मोन्सचे संतुलन राहते.प्राणायामाने रक्तशुद्धीकरण होते. ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. रोज नियमाने १२ सूर्यनमस्कार केले तरी १२ प्रकारचा व्यायाम शरीराला होतो. स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. शरीरस्वास्थ्यासाठी नियमितपणे योग केल्यास कार्यक्षमता वाढते. त्यासाठी रोज स्वतःसाठी वेळ काढून योगा करा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
योगाची प्रात्यक्षिके करून योग प्रकाराचा काय लाभ होतो याची माहिती दिली. सदर शिबिर प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले. आभार डॉ.एस.पी.कापडे यांनी मानले. शिबीर यशस्वितेसाठी डॉ.पी.व्ही.पावरा, प्रा.व्ही.बी. पाटील, प्रा.ए.एस.अहिरराव, प्रा.राजू पावरा, राणा सिसोदिया, प्रकाश जाधव, हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले.