यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व यावल पोलिसांच्या पथकाच्या संयुक्त धाडसत्रातील शहर व तालुक्यातील अंजाळे, पिंप्री या गावात गावठी हातभट्टी वर छापे टाकून ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, फैजपूरचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी तालुक्यातील अंजाळे, पिंप्री व तसेच शहरालगत अवैध गावठी हातभट्टीची दारू सुरू असल्या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीसांनी या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अविनाश चौधरी, हवालदार दिलीप तायडे, सुमित बाविस्कर यांनी अंजाळे शिवारात छापा टाकत कैलास बळीराम सपकाळे (अंजाळे) हा हातभट्टीची दारू गाळताना आढळला मात्र पोलिसांचे पथक पाहून संशयिताने हातभट्टीवरून पळ काढला. हातभट्टीवरून दहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सुशील घुगे, गणेश ढाकणे, गणेश वाघ यांच्या पथकास सूचना दिल्याने यावल-चोपडा रस्त्यावर हडकाई नदीच्या पात्रातील पुलाजवळ कारवाई करण्यात आली. यावेळी गावठी हातभट्टीची दारू गाळणी करताना भैया भगवान शिंदे हा आढळला मात्र तो पसार झाल्यानंतर १२ हजार ५०० रुपयांचा दारू तयार करण्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पथकाने तालुक्यातील पिंप्री शिवारात नदीच्या काठी छापा टाकून पोलीसांनी प्रकाश साळुंखे याच्या ताब्यातून ८००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .पोलीसांनी हातभट्टी दारूवर केलेल्या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत असुन , त्याचबरोबर यावल तालुक्यात सार्वजनिक ठीकाणी व गल्लो गल्ली सर्वत्र मोठया प्रमाणावर मानवी जिवनास अत्यंत घातक अशा साहित्याने बनविली जात असलेल्या पन्नी दारूचा ही बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.