यावल अय्युब पटेल । यावल तालुक्यात आगामी काळात उन्हाळ्यातील तीव्रता लक्षात घेता गावात पाणी टंचाई भासू नये या दृष्टीकोनातून ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांनी दक्ष राहून पेयजल समस्या व अडचणींचे कामकाज करावे असे आवाहन आ. शिरीश चौधरी यांनी केले. यावल शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात आज पाणी टंचाई संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावल तालुक्यात सन २०२१ -२२ या वर्षात ग्रामपंचायतींच्या पाणीटंचाई विषयी आढावा आयोजन येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज करण्यात आली. आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, व चोपडा तालुक्याचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींकडून आगामी काळातील पाणीटंचाई संदर्भात आढावा घेण्यात येईल व आजच्या आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात प्रत्यक्ष कृती काय झाली. याबाबत येत्या महिनाभरानंतर पुन्हा आढावा बैठक घेऊन त्यात कृती आराखडा ठेवण्यात यावा. जेणेकरून घेण्यात आलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली अथवा नाही या विषयी आपणास माहिती मिळेल. अशी सूचना यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामांना मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी मार्च २०२२प र्यंत या योजनेतील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत अशी सूचना अधिकारी वर्गाने केली. मात्र या महत्वाच्या बैठीकीला वड्री, आडगाव येथील सरपंचासह ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी सूचना जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केली. आढावा बैठकीत प्रास्ताविक व सूत्रसंचालन व आभार ग्रामविस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी मानले. प्रसंगी यावल पंचायत समितीचे सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, उपसभापती योगेश दिलीप भंगाळे, जिल्हा परिषदचे गटनेते सदस्य प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील, पंचायत समितीचे भाजपचे गटनेता दीपक पाटील, वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे ,निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर आदी उपस्थित होते.