यावल प्रतिनिधी । तालुक्यात मागील दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या वरूण राजाचे शनिवारी सायंकाळी दमदार आगमन झाल्याने खरिपाच्या पिकांना जिवदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावल शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी शनिवारी ४ जुलै रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान जोरदार पावसाची सुरवात झाली. शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे सकंट टळले असून आज झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरीवर्ग समाधानी झालेले दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरीबांधव दुबार पेरणीच्या संकटात सापडतात की काय? अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. आधीच विविध संकटात सापडलेला शेतकरी वर्ग पाऊस येत नसल्याने हवालदिल झाल्याचे चित्र दिसत होते. शनिवारी दुपार पासूचन वातावरणात बदल झालेला होता. सदर पावसाच्या पाण्याची तूरळक स्वरूपात सुरवात होऊन नंतर पावसाने जोरदार वेग घेऊन मुसळधार पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या पिकांना जीवदान मिळाले. खरीपाच्या हळद, केळी, जुनी खरिपाचा कांदा, भाजीपाला, पपई, फळबाग, कापूस, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर पिकांसाठी चांगले पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यावल तालुक्यात शेती पिकांसाठी एकूण लागवडीचे क्षेत्र 62 हजार 959 इतके असून एकूण भौगोलिक क्षेत्र 65 हजार 278 इतके आहे. काल झालेल्या पावसाची टक्केवारी एकूण 62.2 मिलिमीटर असून सरासरी 10.36 मीटर अशी आहे. गेल्या १२ तासात यावल येथे 35.2 फैजपूर 23.0 भालोद 3.8 बामणोद 0 साखळी 0.2 किनगाव 0.0 अशी नोंद करण्यात आली आहे तालुका आतापर्यंत सरासरी 161 पॉईंट 72 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.