यावल प्रतिनिधी । येथील तहसीलच्या नुकत्याच बांधलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वाराजवळील प्लास्टर अचानक कोसळले. सुदैवाने आज शासकीय सुट्टीचा दिवस असल्याने कुणीही या ठिकाणी हजर नव्हते. या सर्व प्रकाराची तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व तात्काळ संपूर्ण छताचे प्लास्टर काढण्याच्या सूचना दिल्या आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, यावल तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळवून बराच कालावधी संपला होता, परंतु या इमारतीचा कामाला माजी आ. हरिभाऊ जावळे व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी सातत्याने पाठलाग करून सुमारे अडीच ते तीन कोटी खर्चाचे या प्रशासकीय इमारतीच्या कामालास मान्यता मिळवून दिली होती. त्यादृष्टीने संबंधित ठेकेदार यांनी वेगाने हे काम करून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पूर्णत्वास नेले व साधारण ६ ते ७ महिन्यापूर्वीच या इमारतीचे घाईगर्दीने व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण कार्यक्रम करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यावर तहसील कार्यालयाचे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर झाले होते. मात्र त्यानंतर आज १४ एप्रिल रोजी सकाळी या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छताचे प्लास्टर अचानक कोसळले. यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी तात्काळ या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला दूरध्वनीद्वारे घडलेल्या प्रकाराची माहिती कळवली. त्यावेळेस लागलीच ठेकेदाराने आपली माणसे पाठवून त्या उर्वरित छताचे प्लास्टर देखील काढून टाकले. याबाबत आपण कामाच्या ठेकेदारास नोटीस पाठवून जाब विचारणार असल्याचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान अशाप्रकारे घडलेल्या या घटनेमुळे यावल तालुक्यात शासकीय निधीतून सुरू असलेल्या विविध कामांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरी या संदर्भात यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष काढणे गरजेचे आहे.