यावल प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवड प्रक्रियेत नौशाद तडवी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चिती झाली आहे.
येथील नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदासाठी दिनांक १४ जुलै रोजी निवडणूक होणार असून त्या जागेसाठी आज रोजी श्रीमती नौशाद मुबारक तडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या अनुसूचित जमाती महिला या राखीव जागेतून एकमेव सदस्य निवड आलेल्या असल्याने त्यांची नगराध्यक्ष पदाकरिता निवड ही बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिनांक १४ जुलै रोजी औपचारिक बैठकी नंतर ते जाहीर होणार आहे.
यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या सौ सुरेखा शरद कोळी यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी त्यांना अपात्र घोषित केले होते. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर १४ जुलै रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदाची निवड ही आता राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार नगरसेवकांमधून करण्यात येणार असून या नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी श्रीमती नौशाद मुबारक तडवी या एकमेव सदस्य अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गातून निवडून आलेले असल्याने यांची निवड बिनविरोध होणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आज रोजी नौशाद तडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे दाखल केला. त्या अर्जावर सूचक म्हणून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंतराव पाटील व अनुमोदक म्हणून प्रभारी नगराध्यक्ष व नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते यांच्या स्वाक्षर्या आहेत. याप्रसंगी नगरसेवक अतुल पाटील, राकेश कोलते, नगरसेवक अभिमन्यु चौधरी, नगरसेवक प्रा. मुकेश येवले, नगरसेविका रुखमाबाई महाजन, देवयानी महाजन, नगरसेविका कल्पना वाणी, नगरसेविका पौर्णिमा फालक , नगरसेविका सौ रेखा चौधरी आदी उपस्थित होते. त्यांचा उमेदवारी अर्ज यावल नगर परिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी व शिवानंद कानडे तसेच रमाकांत मोरे यांनी स्वीकारला. १४ जुलै रोजी नगराध्यक्षपदाची औपचारिक घोषणा होणार आहे. या निवडीनंतर यावल नगरपरिषदेच्या कारभारावर पुनश्च अतुल पाटील यांच्या गटाचे वर्चस्व झाले आहे. दरम्यान, नौशाद मुबारक तडवी यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.