औरंगाबाद : प्रतिनिधी । यापुढे १ जून नंतर लॉक डाउन वाढविण्याला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून विरोध केला आहे
राज्यात सध्या कठोर निर्बंध लागू असून १ जूननंतर लॉकडाउन कायम राहणार की उठवला जाणार यावरुन सध्या चर्चा रंगली आहे. दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर ठाकरे सरकारने आणलेल्या निर्बधांमध्ये दुकानांचाही समावेश आहे. दुकानं सुरु ठेवण्यासाठी सरकारने सकाळी ७ ते ११ ची वेळ दिली आहे. मात्र ही सूट फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच आहे. दरम्यान लॉकडाउन उठवला नाही तर १ जूननंतर दुकानं सुरु करणार असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
“कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन शिथील करण्याची गरज असून आम्ही लॉकडाउनचं पालन करणार नाही असं औरंगाबादची जनता सांगत आहे. त्यांच्या बोलण्यातही लॉजिक आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी शहराचा आकडा १८०० वर गेला होता, पण आज आपण १२० वर आलो आहोत. ग्रामीण भागात २०० च्या आसपास आलो आहोत. लोकांनी इतकं सहकार्य दिलं, इतकं कष्ट सहन करुन आकडेवारी कमी केली. आता पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन आम्हाला ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही कोणाचं ऐकणार नाही. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मी सांगो…लोक १ तारखेनंतर ऐकणार नाहीत,” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले की, “२७ वर्षाच्या एका तरुण रिक्षाचालकाने आत्महत्या केली याची जबाबदारी कोण घेणार आहे? मी मुख्यमंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करु का?”
“पंतप्रधानांचं तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. या देशात त्यांचे भक्तही ऐकणार नाही. त्याचं कारण जेव्हा देशात लाखोंच्या संख्येने लोक रडत होते तर आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जाऊन ‘दीदी ओ दीदी’ असं करत होते. आता लोक त्यांना ‘दादा गप्प बस दादा’..म्हणणार आहेत. आता ती वेळ आली असून स्वत: पंतप्रधानांनी ती आणली आहे. आता टीव्हीवर येऊन रडण्याचं काही कारण नाही. आम्हाला माहिती आहे कोण कसा अभिनय करतं. लोकांना सांभाळण्याची वेळ होती तेव्हा जाऊन प्रचार करत होतात, लाखोंच्या संख्येने गर्दी गोळा करत होतात आणि आता ज्ञान पाजळत आहात,” अशा शब्दांत यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.
“पंतप्रधानांना सांगा की औरंगाबाद नावाचं एक शहर आहे जिथे तुमच्या निर्णयाचं पालन करणार नाही असं ठरवलं आहे,” असंही ते म्हणाले आहेत.