मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी यापुढे आपल्या डोळ्यात अश्रू येणार नसून आपण दुसर्यांच्या डोळयातून पाणी काढू असा इशारा दिला आहे.
रामदास कदम हे काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना गहिवरले होते. शिवसेनेबाबत बोलतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या रडण्यावरून संजय राऊत, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी जोरदार टीका केली होती. यालाच आता रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रत्युत्तर दिले आहे.
रामदास कदम म्हणाले की, आपण कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो त्यांच्याशी दोन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. यात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी सकारात्मकता दर्शविली आहे. यानंतर गोवा-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण करण्याविषयी विचारले असता, शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन ताबडतोब महामार्गाचे काम पूर्ण करु असं अश्वासन दिलं आहे.
याप्रसंगी कदम पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि संघर्षाची शिकवण दिली आहे. त्यामुळे गुडघे टेकणारा रामदास कदम नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, यापुढे मी डोळ्यांतून पाणी काढणार नाही. मात्र समोरच्याला डोळ्यांतून पाणी नक्की काढायला लावेल असा इशारा त्यांनी दिला.