जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे पुलाच्या बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा आढळून आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनुसार गुरूवार ७ जुलै रोजी वाळू साठ्यावर कारवाई करून पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या वाळूचा साठवणूकीचा ठेका देण्यात आला आहे. शासकीय कामासाठी वापरण्यात येणारी वाळू ही जळगाव शहरात अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व महसूल विभागाला ईमेलद्वारे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाच्या पथकासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी म्हसावद वाळू साठा केलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी महसूल विभागाचे मंडळाधिकारी, तलाठी यांनी पंचनाम्याच्या कारवाईवाला सुरूवात केली आहे. याठिकाणी वाळूसह खडी देखील आढळून आली. आतापर्यंत २५० ब्रास वाळू आणि ९ ब्रास खडी यांचा पंचनामा करण्यात आला आहे. अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता दीपकगुप्ता यांनी दिली आहे. अजूनही याच परिसरातील वाळूच्या साठ्याची पाहणी करून पंचनामा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.