मुंबई (वृत्तसंस्था) जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान ‘वाईन शॉप्स’ सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे असा, सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे अर्थचक्र पुन्हा सुरु गतिमान करण्यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील असे म्हटले आहे. प्रामुख्याने सामान्यांची गरज लक्षात घेता हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील मागणी राज यांनी या पत्रामधून केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटवरुन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राचे फोटो ट्विट केले आहेत. या पत्रात राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारने करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळे कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ‘वाईन शॉप्स’ सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. आता जवळपास राज्य ३५ दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल, असं राज ठाकरेंनी सांगितले आहे.