पुणे : वृत्तसंस्था । मराठा आरक्षणाचे राजकारण करण्यासाठी राज्यातील भाजप नेते निरर्थक बोलतात म्हणून मला राग येतो असे आज उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले
महाविकास आघाडीसमोर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा मोठा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून राज्य सरकारवर टीका होत असून, छत्रपती संभाजीराजे यांनीही सरकारला इशारा दिला आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वच मुद्द्यांवरून अजित पवार भाजपावर भडकले. “हेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता,” अशा शब्दात अजित पवारांनी भाजपावर निशाणा साधला.
५४ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र बाहेर कसं आलं, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले,”जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले आहेत. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता कोरोनाकडे लक्ष देणं आता महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यपाल यांना भेटलो, वरिष्ठांना देखील भेटणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे ग्राह्य धरलं, त्यानुसार साकल्याने विचार करू. सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले आणि सदस्यांची मतं घेत असून, आम्ही मार्ग काढत आहोत. मात्र काही जण काहीही स्टेटमेंट करत आहेत. टिकवता आलं नाही असं म्हणत आहेत. हेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता. आम्हीच असं केलं होतं, तसं केलं होतं. असले धंदे आहेत, त्यामुळे याचा मला राग येतो,” अशी संतप्त टीका अजित पवारांनी केली.
नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारवर टीका केली होती. त्यालाही अजित पवार यांनी उत्तर दिलं. “काही काहीजण भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात. कायदा, संविधान काहीही बघत नाहीत. म्हणून ती बातमी चालते. ही लोक काही काळ आमच्या बरोबर होती. त्यांचा आवाका किती आहे. हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे फार महत्त्व देत नाही,” असं अजित पवार म्हणाले. संभाजीराजे यांनी दिलेल्या इशाऱ्यावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली. “मी त्यांच्याशी बोललो होतो. पण त्यांनी सांगितलं की, ६ तारखेचा कार्यक्रम होऊ द्या. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. आता महाविकास आघाडी सरकार त्यावर लवकरच निर्णय घेईल,” असं अजित पवार यांनी सांगितलं.