जळगाव प्रतिनिधी । किराणा दुकानातून माल उधार देण्याच्या कारणावरून सहा जणांनी एकाला मारहाण करून कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच तालुक्यातील मोहाडी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोविंदा गंगाराम गवळी (वय-२८) रा. मोहाडी ता.जि.जळगाव हा मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गावातील आतेभाऊ विजय गजानन गवळी यांचे किराणा दुकान आहे. १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कामावरून घरी परत येत असतांना किराणा दुकानावर गर्दी दिसली. दुकानावर गावातील शरद दिनकर कोळी, कृष्णा गोपाल तायडे, संतोष यादव कोळी, विशाल संजय कोळी, सागर संजय कोळी आणि गोपाल रामा तायडे यांनी आतेभावाकडे किराणा दुकानातून किराणा उधार देण्यावरून वाद सुरू होता. गोविंदा गवळी याने सर्वांना समजावून सांगून घरी मंडपाच्या गोडावूनची चावी घेण्यासाठी रस्त्याने जात असतांना वरील सर्व सहा जणांनी आडवून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तर शरद दिनक कोळी याने पाठीमागे येवून गोविंदाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. जखमीवस्थेत नातेवाईकांना तातडीने जळगावातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गोविंदा गवळी याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित सहा आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.