नवी दिल्ली : वृत्तसंस्था । फक्त नितीन गडकरी यांच्याकडे मोदींसमोर आवाज उठवण्याची हिंमत आहे. पण तेदेखील सध्या शांत आहेत अशी खंत पी चिंदबरम यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारमध्ये सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घेतले जात असल्याचा दावा काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांनी केला आहे. मोदींकडून सर्व निर्णय घेतले जात असून यावेळी केंद्रीय मंत्री कोण आहे याचा फरक पडत नाही असं ते म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यासंदर्भात बोलताना पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसंच नितीन गडकरी यांना आपल्या मायक्रोफोनचा आवाज वाढवा असा सल्ला दिला. “मला वाटतं फक्त नितीन गडकरींमध्ये आवाज उठवण्याची हिंमत आहे. पण तेदेखील आता शांत आहेत. त्यांना आता स्वत:ला अनम्यूट केलं पाहिजे,” असा सल्ला पी चिदंबरम यांनी दिला आहे.
“प्रत्येक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घेतला जातो हे या देशातील प्रत्येकाला माहिती आहे. मग ‘एक्स’ अर्थमंत्री असो किवा ‘वाय’ असो…त्याने काही फरक पडत नाही,” असं यावेळी ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “जिथपर्यंत मोदींचा प्रश्न आहे, तेच अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मत्री, क्रीडामंत्री सर्व काही आहेत. त्यामुळे मंत्री कोण आहे याने फरक पडत नाही”.