नवी दिल्ली,वृत्तसंस्था । मोदी सरकारने जारी केलेल्या अध्यादेशावर विचार करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक समिती गठीत केली आहे. या समितीत अनेक ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आले असले, तरी देखील गुलामनबी आझाद आणि आनंद शर्मा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी गुलामनबी आझाद यांच्यासह २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरून पक्षात वाद उफाळून आला होता.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गठीत केलेल्या समितीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, डॉ. अमरसिंह आणि गौरव गोगोई यांचा समावेश आहे. या समितीचे संयोजक म्हणून जयराम रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती केंद्र सरकारडून जारी करण्यात येणाऱ्या महत्वाच्या अध्यादेशांवर चर्चा करून पक्षाची भूमिका ठरवण्याचे काम करणार आहे.