मोदी यांच्यावर आता ओवेसीही खवळले

 

 

कोलकाता : वृत्तसंस्था । “बांगलादेशमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला. तुम्ही बांगलादेशसाठी सत्याग्रह केला, तर मग मुर्शीदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?  आमच्याबद्दल वाईट का बोलता?” असं ओवेसींनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

 

बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. काल (शुक्रवार)मोदी तिथं पोहचल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्याचे स्वागत केले व मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. यानंतर त्यांनी बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली, तिथे त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत एक मोठं विधान केलं. ज्यावर भारतातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यावरून आता एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

 

“भाजपा देशात इतका द्वेष पसरवला आहे की, जेव्हा मुस्लीम नावाचं एखादं मूल पाण्यासाठी मंदिरात जातं, तेव्हा त्याला पिटाळून लावलं जातं. मुस्लिमांना ‘जिहादी’, आदिवासींना नक्षलवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारवंतांना ‘देशद्रोही’ असे म्हटले जाते.” असा गंभीर आरोप देखील यावेळी ओवेसींनी भाजपावर केला.

 

 

ढाका येथील एका कार्यक्रमात  पंतप्रधान मोदी, “मी बांगलादेशातील बंधू व भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती.” असं म्हणाले होते.

Protected Content