नवी दिल्ली वृत्तसंस्था । आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक न लढविण्याचा निर्णय आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे.
आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मफअरविंद केजरीवाल हे सध्या केवळ दिल्लीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. तथापि, आप वाराणसी येथून मोदींविरोधात तगडा उमेदवार देणार आहे, असेही संजय सिंह यांनी सांगितले. २०१४ साली केजरीवाल यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. या वेळी ते पुन्हा मोदींच्या विरोधात लढणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी मैदानात न उतरण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे ही शक्यता मावळली आहे.