मोदींनी कडक भाषेत सुनावल्याने पाककडून अभिनंदन यांची सुटका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदींनी कडक भाषेत सुनावल्याने पाककडून अभिनंदन यांची सुटका  करण्यात आली होती

बालाकोट एअर स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या एअर स्ट्राइकच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय आणि पाकिस्तान फायटर विमानांमध्ये काश्मीरच्या आकाशात डॉगफाइट झाली होती. यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी मिग-२१ बायसनमधून R-73 मिसाइल डागून पाकिस्तानचे  विमान पाडले.

 

पण त्याचवेळी मिसाइल किंवा आर्टिलरीने हिट केल्यामुळे त्यांचे मिग-२१ विमान सुद्धा पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागलेल्या वर्थमान यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील काही फोटो पाकिस्तानी सैन्याने व्हायरल केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या पंतप्रधान मोदींनी थेट ‘रॉ’ च्या प्रमुखांशी संपर्क साधला व त्यांना काही सूचना केल्या.

 

त्यावेळच्या तत्कालिन ‘रॉ’ प्रमुखांनी लगेच समकक्ष असलेल्या आयएसआयच्या प्रमुखांना फोन केला व मोदींचा संदेशच त्यांच्यापर्यंत पोहोचवला. आमच्या वैमानिकाला थोडीशी जरी इजा पोहोचली, तर त्याचे पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशाराच रॉ च्या प्रमुखांनी पाकिस्तानला दिला. पडद्यामागे त्यावेळी जे घडलं, त्यामुळेच इम्रान खान यांना लगेचच भारतीय वैमानिकाची सुटका करावी लागली.

 

पाकिस्तानने भारतीय वैमानिकाला बंधक बनवल्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर भारताने जलदगतीने आणि निर्णायकपणे वैमानिकाच्या सुटकेसाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतला. अभिनंदन यांचा रक्तबंबाळ चेहऱ्याचा फोटो पाहिल्यानंतर मोदींनी रॉ च्या प्रमुखांना सूचक शब्दात पाकिस्तानपर्यंत संदेश पोहोचवायला सांगितला. अभिनंदन यांना हात लागला, तर भारत गप्प बसणार नाही. लवकरात लवकर त्यांची सुटका करा, असा स्पष्ट संदेश मोदींनी द्यायला सांगितला होता.

 

‘आम्ही शस्त्रास्त्रांचा ताफा दिवाळीसाठी ठेवलेला नाही’ असा संदेश मोदींनी दिला होता. अभिनंदन सुखरुप माघारी परतले पाहिजेत, त्यांना हात लागला तर सर्वस्वी सगळी जबाबदारी पाकिस्तानची असेल, असे तत्कालिन रॉ प्रमुख अनिल धस्माना यांनी आयएसआय प्रमुखांना सांगितले. रॉ चीफच्या त्या आवेशाने आयएसआय च्या प्रमुखांनाही धक्का बसला होता. आपल्या संदेशमागची सज्जता दाखवण्यासाठी राजस्थान सेक्टरमध्ये सैन्याला पृथ्वी क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्यास सांगण्यात आली होती. भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिकेची सुद्धा चिंता वाढली होती.

Protected Content