नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी आज (16 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर झाला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. परंतु, ते दुसऱ्या कार्यक्रमात व्यग्र असल्याने ते येथे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आशीर्वाद द्यावा ही अपेक्षा आहे, असे केजरीवाल म्हणाले.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानात त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरीक उपस्थितीत होते. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला. अरविंद केजरीवाल यांचा हा शपथविधी सोहळा दिल्लीत सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे होते. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे ते येऊ शकते नसावेत. वाराणसी येथे त्यांनी जंगमवाडी मठाला भेट दिली. तेथे पूजाअर्चा केली. त्यानंतर ते जगतगुकरू विश्वराद्य गुरूकुल शतकोत्सव सोहळ्यासाठी गेले. तेथे त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले.