मुंबई : वृत्तसंस्था । शरद पवार आणि किशोर यांची भेट झाली असली तरी मोदींना हरवणं सोपं नाही. 2024 ला मोदींच्याच नेतृत्वात सत्ता येईल, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पवार आणि किशोर यांच्या भेटीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुसाठी स्ट्रॅटेजी आखण्याबाबत चर्चा झाल्याची बोललं जात आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.
नरेंद्र मोदी हे स्ट्रॉंग नेते आहेत. प्रशांत किशोर यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना काही शक्य होणार नाही. प्रत्येकाला प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, असं आठवले म्हणाले. विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं असं काहींचं म्हणणं आहे. पण ते शक्य होणार नाही. काँग्रेसविरोधात जसा जनता पार्टीचा प्रयोग झाला तसा मोदींबद्दल होणं शक्य नाही, किंबहुना आम्ही तो होऊ देणार नाही, अशा इशाराच आठवले यांनी विरोधकांना दिलाय 2024 ला भाजपच्या 303 नाही तर 350 जागा आम्ही निवडून आणू, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.
देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची पवारांची इच्छा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु, ते देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.