कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेश दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, बांगलादेशचा त्यांचा दौरा हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे.
शनिवारी खडगपुर येथील मोर्चाला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि पंतप्रधान बांगलादेशात जातात आणि बंगाल बद्दल भाषणं देतात. हे निवडणुकीच्या आचारसंहितेचे संपूर्ण उल्लंघन आहे. ”
शनिवारी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान मोदी शनिवारी पश्चिम बंगालचे खासदार शांतनु ठाकूर यांच्यासमवेत ओरकंडी दौऱ्यावर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शेख मुजीबुर रहमान यांच्या समाधीस्थळाला भेट दिली आणि त्यांना पुष्पांजली वाहिली. ते बांग्लादेशातील तुंगीपारा येथे ‘बंगबंधू’ यांच्या समाधीस श्रद्धांजली वाहणारे पहिले सरकार प्रमुख झाले आहेत.
समाधीस्थळावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले, हसीना या शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. रहमान यांची धाकटी कन्या शेख रेहाना देखील यावेळी उपस्थित होत्या.
ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीबद्दल त्यांची खिल्ली उडविली. त्या म्हणाल्या की, त्यांची दाढीची वाढ अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या बरोबर उलट आहे.
पश्चीम मेदिनीपूर जिल्ह्यात मतदान सभांना संबोधित करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी भाजपाला “सर्वात मोठा फसवणूक करणारा पक्ष” असेही संबोधले.