नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । केंद्र सरकारने सन २०१६ मध्ये नोटबंदीचा मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून विरोधकांनी अनेक आंदोलने केली. यात अनेकांचे मोठे नुकसान देखील झाले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला क्लिन चीट दिली असून केंद्र सरकारने केलेली नोटबंदी योग्यच होती असा निर्णय दिला आहे.
नोटबंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या 58 याचिका दाखल करण्यात आल्या. नोटाबंदीचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच होता. आर्थिक धोरणाशी संबंधित निर्णय मागे घेतला जाऊ शकत नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दाखल झालेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयात कोणतीही गडबड दिसून येत नाही. तसेच आर्थिक निर्णय फेटाळता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीआर गवई यांनी हा फैसला सुनावला. कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित नऊ मुद्द्यांचा विचार केला. नोटाबंदीचा निर्णय एकतर्फी झालेला नाही. हा निर्णय घेताना आरबीआय आणि केंद्र सरकारमध्ये सल्लामसलत झाले होते. तसेच नोटाबंदीचा निर्णय घेताना ज्या प्रक्रियेचा अवलंब केला गेल्याचे सांगत निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे.