रावेर प्रतिनिधी । दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात मोटारसायकल चालकाने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर-रसलपूर रस्त्यावरील भूत बंगल्या जवळ पुढे एका मोटारसायकलला मागून येणार्या अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात पुढील मोटारसायकलवर मागे बसलेले तुळशीराम सोमा महाजन (रा. महात्मा फुले चौक, रावेर) हे खाली पडल्याने गंभीर जखमी झाले होते. तात्काळ त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार वसंत रुपचंद महाजन हे जखमी झाले आहेत. दरम्यान, धडक देणार्या अज्ञात मोटारसायकलस्वाराने घटनास्थळावरून पलायन केले असून त्याच्या विरुद्ध येथील पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुनील कदम करीत आहेत.