जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या विविध भागांमध्ये मॉर्निंग वॉक करतांना फिजीकल डिस्टन्सींगचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमिवर, आज यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस व गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
याबाबत वृत्त असे की, जळळगाव शहरात कोरोनाच्या नियंत्रणासाठी एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन १३ जुलै पर्यन्त असणार आहे. यात सकाळी फिरणारे स्त्री-पुरूष फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करत नसल्याच्या तक्रारी आल्या होता. या अनुषंगाने आता यावर नजर ठेवण्यासाठी गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांची (होमगार्ड) नेमणूक करण्यात आली आहे.
शहरातील प्रसिद्ध शंभर फुटी रस्त्यावर आणि त्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत शेकडो लोक मॉर्निंग वॉक साठी येत असतात. मात्र या नेहमीच्या रस्त्यावर कमालीचा शुकशुकाट दिसून येत असून त्या परिसरात गृह रक्षक दलाचे जवान तैनात आहेत. ये-जा करणार्यांना ते चांगलीच तंबी देत असल्याचे दृश्य आज दिसून आले.
यामुळे मॉर्निंग वॉक करता येत नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. तथापि, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक आहे. तर दुसरीकडे बरेच जण आपापल्या घराच्या गच्चीवर योग, प्राणायाम व व्यायाम करतांना दिसत आहेत. तथापि, काही भागांमध्ये अजून देखील मॉर्नीग वॉक करणार्यांची गर्दी आढळून येत आहे.