जळगाव शहरातील मेहरून परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत तब्बल ८ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत १ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद हारून अब्दुल कादिर खाटीक (वय-४३, रा, मेहरून जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून एका खाजगी न्यूज चॅनलचे ते संपादक आहेत. २३ मे रोजी रात्री ११ ते ३१ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उन्हाळी सुट्टी असल्याकारणामुळे सर्वजण दुबईला फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले १ लाख रुपयांची रोकड आणि ७ लाख २० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान नदवी हे ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता घरी आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. तसेच घरातील सामान अस्तवस्थ पडलेला दिसून आला. त्यानंतर त्यांनी कपाटात जाऊन पाहाणी केली असता घरातील दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. हे घटना कळल्यानंतर त्यांनी गुरुवार १ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.