जळगाव, प्रतिनिधी । जळगाव डीस्ट्रीक मेडिकल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे आणि अनिल झवर यांनी न्यासाच्या नावाने १९ जानेवारी रोजी आयोजित केलेली सभा घटनाबाह्य असून ती सभा घेण्याचा त्यांना हक्क व अधिकार नसल्याचा आरोप दिपक जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला.
दिपक जोशी यांनी पुढे सांगितले की, न्यासाच्या नावाने बी. जे. मार्केट येथील मिळकत परस्पर कमी किमतीत विक्री केली आहे. ही विक्री करण्यापूर्वी श्री. भंगाळे यांनी न्यायालयाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही. श्री. भंगाळे हे न्यासाची मिळकत, पैसा यांचा स्वतः गैरमार्गाने विल्लेवाट लावून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत. श्री. भंगाळे व त्याच्या कार्यकारणी मंडळास न्यासाच्या मिळकती व पैशांचा वापर करण्याचा कोणताही हक्क नाही व अधिकार नाही. यासर्व बाबी स्पष्ट होत नाही तोपर्यंत श्री. भंगाळे यांना न्यासाचे कार्यकारी मंडळात कार्यरत राहण्याचा कोणताही हक्क नाही व अधिकार नसल्याने श्री. भंगाळे यांच्या कार्यपद्धतीबाबत व मागील काळाचे झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी श्री. जोशी यांनी केली आहे. न्यासाचे नावाने वेळोवेळी घटनाबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवीत आहेत. म्हणून १९ जानेवारी रोजी होत असलेली न्यासाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही बेकायदेशीर आहे.