मृत महिलेचा मृतदेह बदलला; गोदावरी हॉस्पीटलचा भोंगळ कारभार ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनी भागातील रहिवासी महिलेचा मृतदेह बदलून दुसरेच पार्थिव देण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. गोदावरी हॉस्पीटलमधून हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, मुस्लीम कॉलनी भागातील रहिवासी फातेमाबी समद पिंजारी (वय ६५) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर गोदावरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. काल सायंकाळीच त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचा रिपोर्ट आला होता. तर रात्री उशीरा त्यांचे निधन झाल्याचे हॉस्पीटलने कळविले. यानंतर आज सकाळी त्यांचे आप्त मृतदेह घेण्यासाठी गेले असता त्यांना हॉस्पीटल्समधील डॉक्टर्सनी मृतदेहाला पाहू न देता रूग्णवाहिकेतून पार्थिव रवाना केले.

दरम्यान, मृतदेह घेऊन आलेल्या रूग्णवाहिकेतून जेव्हा शवपेटी बाहेर काढण्यात आली तेव्हा त्या महिलेचे कुटुंबिय आणि आप्तांना प्रचंड धक्का बसला. कारण हा मृतदेह फातेमाबी यांचा नव्हे तर दुसर्‍याच महिलेचा असल्याचे त्यांना आढळून आले. काही क्षणातच ही वार्ता वार्‍यासारखी पसरली. याबाबत हॉस्पीटलला विचारणा केली असता त्यांना प्रारंभी नीट उत्तर देण्यात आले नाही. नंतर मात्र मृतदेह बदलल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चौकशी केली असता हा मृतदेह जळगाव येथील एका हिंदू महिलेचा असल्याचे आढळून आले. आता संबंधीत महिला ही जर कोरोना पॉझिटीव्ह असेल तर हा प्रकार अतिशय गंभीर बनणार असल्याने परिसरात तीव्र क्षोभ व्यक्त करण्यात येत आहे. आमदार संजय सावकारे, माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांच्यासह मान्यवरांनी मृत कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर, गोदावरी हॉस्पीटलच्या या भोंगळ कारभाराची चौकशी होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओत पहा नेमके काय आहे हे प्रकरण ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/603360673686816/

Protected Content