मृतदेहातून कोरोना संसर्ग ? ; भोपाळमध्ये संशोधन

 

भोपाळ: वृत्तसंस्था । कोरोना व्हायरस रुग्णाच्या मृतदेहातूनही संसर्ग होऊ शकतो का? यावर भोपाळमधील एम्समधील शास्त्रज्ञांचं पथक संशोधन करत आहे. संसर्गाच्या भीतीने मृताचे नातेवाईक आणि कुटुंबीय अखेरचा निरोपही योग्यरित्या देत नसल्याचं बऱ्याच घटनांमधून समोर आलं आहे.

कर्नाटकमधील बेल्लारीमध्ये तर जुलैमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. कोरोनाने मृत्यू झालेल्या ८ रुग्णांचे मृतदेह अक्षरशः एका खड्ड्यात फेकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर हे संशोधन महत्त्वाचे असणार आहे. या संशोधनामुळे करोनाने होणारे मृत्यू आणि मृतदेहांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकतो.

प्राथमिक निष्कर्षांमध्ये शरीराच्या पृष्ठभागावर व्हायरसची उपस्थिती किंवा शरीराच्या पृष्ठभागावर प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. हे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. कोरोनामुळे व्हेस्कुलर सिस्टमवर सर्वाधिक परिणाम होतो, असं हिस्टोपॅथोलॉजी आणि इतर विश्लेषणाच्या प्राथमिक निष्कर्षांवरून दिसून आलं आहे. यामुळे रक्त साकळणं आणि रक्तश्राव होतो. परिणामी थ्रोम्बोसिस होतो बऱ्याचदा रुग्ण बरे होऊन घरी जातात. पण त्यांचा थ्रोम्बोसिसने मृत्यू होतोय, अशी माहिती भोपाळमधील एम्सचे संचालक प्राध्यापक सरमन सिंग यांनी दिली.

केंद्र सरकराने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. हायपोक्लोराइट द्रावणाचा वापर असलेल्या एका लीक-प्रूफ प्लास्टिक बॅगमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह ठेवावा, असं या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं आहे.

प्राध्यापक सिंग यांनी चिंता वाढवणारी आणखी एक गोष्ट सांगितली. हा व्हायरस आपले स्वरुप बदलत आहे. ज्याला शास्त्रीय भाषेत म्यूटेशन असं म्हणतात. एका देशातून दुसऱ्या देशात प्रादुर्भाव होताना आणि देशातल्या देशातही कोरोना आपले स्वरुप वेगाने बदलत आहे. स्वरुपात हा बदल किंवा रूपांतर जेनेटिक मार्गातून होतोय. यामुळे लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं, असं प्राध्यापक सिंह म्हणाले.

 

सुमारे १३२५ नमुने तपासले गेले. त्यात ८८ हून अधिक नमुन्यांमध्ये व्हायरसने स्वरुप बदलल्याचं आढळून आलं आहे. कोरोनाच्या सर्व स्वरुपांवर मात करून शकेल अशी परिणामकारक लस हवी आहे. म्हणून लस तयार होण्यास अधिक वेळ लागू शकतो. एखादी लस आज प्रभावी ठरली तर ही लस पुढच्या ३ ते ६ महिन्यात प्रभावी ठरेलच असं नाही.

भोपाळच्या एम्समध्ये कोरोना बाधित रुग्णांवर मायकोबॅक्टीरियम-डब्ल्यू औषधाची चाचणी केली केली. याचा रिझल्ट उत्साहवर्धक आला आहे. कुष्ठरोग्यांना देण्यात येणारं हे औषध कोरोनाच्या गंभीर रूग्णांनाही देण्यात आलं होतं, जे प्रभावी ठरलं आहे. आता हे औषध निरोगी नागरिकांना दिलं जाऊ शकतं की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जात आहे

Protected Content