जळगाव प्रतिनिधी । प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या निर्मिती व विक्रीविरोधात असलेली बंदी केंद्र सरकारने तत्काळ कायमस्वरूपी उठवावी या मागणीसाठी जळगाव जिल्हा मूर्तिकार संघटनेने धुळे व नंदुरबार संघटनेच्या सोबत २० जानेवारी रोजी सकाळी ११. ३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे.
जळगाव जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या नेतृत्वाखाली जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही संघटनांची जळगावात बैठक झाली. त्यात केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या निर्मितीविरोधात घातलेल्या बंदीविरोधात चर्चा करण्यात आली. केंद्राचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येणाऱ्या माघी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी पीओपी वापराच्या निर्बंधातून १२ जानेवारी रोजी तूर्तास मुक्त केले आहे. या निर्णयाचे स्वागत असले तरी हि बंदी कायमस्वरूपी उठवावी याविषयी तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी मूर्तिकार संघटनेची आहे. मूर्तिकार आणि त्यांच्याकडील मूर्ती रंगवणारे कारागीर यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. अनेक आर्थिक व कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे कायमस्वरूपी बंदी उठवावी या मागणीसाठी दि. २० जानेवारी रोजी सकाळी ११. वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शामाप्रसाद मुखर्जी उद्यानांपासून आक्रोश मोर्चा काढण्याचे एकमताने ठरवण्यात आले आहे. कोरोना निर्मूलनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व मूर्तिकार बांधवानी, गणेश मंडळांनी, मूर्तिकार, कामगार यांनी मोर्चात सहभागी होऊन गणेश मूर्ती बंदी विरोधात आवाज उठवावा असे आवाहन जळगाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन, धुळेचे जिल्हाध्यक्ष राजू चित्ते, नंदुरबार संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले आहे.