दुबई : वृत्तसंस्था । अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा, मद्यावरील निर्बंध शिथिल करणे आणि तथाकथित ‘ऑनर किलिंग’ हा गुन्हा ठरवणे अशारितीने देशाच्या इस्लामी वैयक्तिक कायद्यांमध्ये मोठे बदल करण्यात आल्याचे संयुक्त अरब अमिरातींनी (यूएई) जाहीर केले.
देशाची कायदा यंत्रणा इस्लामी कायद्यांच्या कठोर अशा अंमलबजावणीवर आधारित असताना, अशाप्रकारच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विस्तारातून देशाचे बदलते रेखाचित्र प्रतिबिंबित झाले आहे. देशातील वेगाने बदलणाऱ्या समाजासोबत वाटचाल करण्याच्या अमिरातीच्या राज्यकर्त्यांच्या प्रयत्नांचेही या बदलांमध्ये प्रतिबिंब उमटले आहे.
यूएई व इस्रायल यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने या दोन देशांमध्ये झालेल्या करारानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. कायद्यातील या सुधारणांची घोषणा सरकारी वृत्तसंस्थेमार्फत करण्यात आली व तिचे तपशील सरकारशी संलग्न असलेल्या वर्तमानपत्रात जाहीर करण्यात आले.
२१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांनी मद्यपान करणे, विक्री आणि मद्य बाळगणे यांसाठी असलेली दंड आकारण्याची तरतूद या बदलांन्वये रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी मद्य खरेदी करणे, त्याची वाहतूक आणि मद्य घरात ठेवणे यांसाठी परवाना आवश्यक होता. नव्या नियमामुळे मुस्लिमांना मद्यप्राशनाची, अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा देण्यात आली आहे.