मुलीनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने केली आई-वडिलांची हत्या

 

इंदूर: वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील इंदूरमधील दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. दोघांनाही रतलाम येथून अटक केली आहे. दोघेही दुचाकीवरून राजस्थानला पळण्याच्या तयारीत होते.

आरोपींजवळील काही कपडे आणि १ लाख रुपये जप्त केले आहेत. आरोपी मुलीचे वय १७ वर्षे असून, ती अकरावीत शिकते. तर धनंजय उर्फ डीजे असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. आरोपींनी आई-वडिलांच्या हत्येचा कट आधीच रचला होता. सकाळी मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलावले. त्यानंतर ती स्वतः घराबाहेर फिरायला गेली.

बॉयफ्रेंडने सुरुवातीला तिच्या आईची हत्या केली. त्यानंतर वडिलांना ठार मारले. तत्पूर्वी गुरुवारी इंदूरच्या एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुक्मिणी नगरात पती-पत्नीची हत्या झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. हत्या झालेली व्यक्ती ही मध्य प्रदेशच्या एसएएफमध्ये कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते. ज्योतिप्रसाद शर्मा असे त्याचे नाव असून, नीलम असे पत्नीचे नाव आहे.

हत्येच्या घटनेनंतर त्यांची १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. पोलिसांना घरात एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीत मुलीने आपल्या पित्यावर गंभीर आरोप केले होते. वडील अत्याचार करत होते आणि आई त्यांना साथ देत होती. त्यामुळे या त्रासाला कंटाळून मी घर सोडून जात असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले होते. मुलगी बेपत्ता असल्याने तिच्यावर या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

Protected Content