परभणी (वृत्तसंस्था) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे उल्लंघन करून उपविभागीय अधिकारींशी हुज्जत घालत थेट त्यांची कॉलर पकडल्याप्रकरणी चार तरूणांसह एका महिलेविरूद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचारबंदी लागू असल्याने सेलू शहरात शनिवारी निर्धारित वेळ संपल्यानंतर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व महसूल विभागातील कर्मचारी शहरात गस्त घालत होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास सेलू ते जिंतूर रस्त्यावर मीनाक्षी टॉकीजजवळ त्यांना तीन तरूण दुचाकीवर फिरत होते. पारधी यांच्या वाहनाने दुचाकी थांबवायच्या सूचना केल्या. परंतू त्यातील एक जण श्रीराम कॉलनीत उतरला. तर दोघे पारिजात कॉलनी मार्गे सेलू-सातोना रस्त्याकडे भरधाव वेगाने पुढे निघाले. ध्वनीक्षेपकावरून त्यांना वारंवार थांबण्याचे आवाहन करण्यात येत होते. पण ते थांबले नाहीत. थोड्या अंतरावर एका घरात त्यांनी प्रवेश केला. दरम्यान या मुलांना तुम्ही पोलीस ठाण्यात का घेऊन जाता, अशी विचारणा करत मंजूताई जिजा राठोड या महिलेने उपविभागीय अधिकारी पारधी यांची कॉलर धरली. या प्रकरणी प्रभारी नायब तहसीलदार अनंता दत्तात्रय शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संचारबंदीचे उल्लंघन करणे व अन्य कलमांन्वये राजेश जिजा राठोड, मंजुताई जिजा राठोड, संतोष जिजा राठोड, विशाल रमेशराव नागठाणे, पंकज नागरे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.