मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणसह महाराष्ट्राच्या काही भागात मोठे नुकसान केले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करुन रायगडसाठी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. परंतू, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज (6 जून) पत्रकारांशी संवाद साधला. निसर्ग चक्रीवादळाने कोकणमध्ये मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय पुणे जिल्हा, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मोठे नुकसान झाले आहे. पीक, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडांची पडझड झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडला जाऊन 100 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. नुकसान प्रचंड मोठं आहे. त्यामुळे योग्य मदत करणे आवश्यक आहे. फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे ५ प्रमुख मागण्याही केल्या आहेत. गेल्या वर्षी विशेष जीआर काढून एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त मदत केली होती. तशाच प्रकारची मदत केली पाहिजे. कोल्हापूरसाठी 4800 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यांना एकूण 6800 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आता जाहीर केलेले 100 कोटी अतिशय तुटपुंजे आहेत. त्या रकमेत वाढ करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.