मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या वेळी प्रचार वेळ संपूनही ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली असून त्यांनी आदर्श आचार संहिता भंग केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी मंत्री नसीन खान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात वरवरून एकवाक्यता असली तरी आतून मात्र तिन्ही पक्षांमधील शीतयुध्द कधी खदखदत उफाळून वर येईल याचा नेम नाही. २०१९- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी २१ ऑक्टोबरला मतदान पूर्वी दोन दिवस अगोदर १९ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजेनंतर निवडणूक प्रचाराची वेळ संपुष्टात आली होती. तरीही उध्दव ठाकरे, अनिल परब आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी यांनी निवडणूक प्रचार वेळेनंतरही सभा घेतली व निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. असा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नसीन खान यांनी करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
माजी मंत्री खान यांनी म्हटले आहे कि, १९ ऑक्टोबरला प्रचार बंद झाला असूनही २० ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उध्दव ठाकरे व त्यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी सभा घेतली, पदयात्रा काढली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला. त्यावेळीही आम्ही निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. मात्र, त्यावर कारवाई अपेक्षित होती ती झालेली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आदर्श आचारसंहितेचा भंग होऊन माझ्याबाबत अन्याय झाल्याबद्दलची तक्रार यापूर्वीच केली आहे. ही याचिका महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला, महाविकासआघाडीची स्थापना झाली त्याहि अगोदरची ही याचिका दाखल आहे. या पुढील कारवाई म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आचार संहिता भंग तक्रारीची दखल घेत सर्वांना नोटीस बजावली आहे, हा माझा व्यक्तिगत विषय, काँग्रेस पक्षाशी संबंध नाही आणि माझा हा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणं वेगळा भाग आहे. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचा महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर असून या याचिकेचा व पाठींब्याचा त्याच्याशी याचा संबंध नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा पाठिंबा देण्याचा भाग पक्ष स्तरावरून वेगळा आहे. या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका काँग्रेसकडून असणार नसल्याचेही काँग्रेसचे माजी मंत्री नसीन खान म्हटले आहे.