मुंबईः वृत्तसंस्था । ‘मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले आहेत. खरं तर मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीची नाही,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
‘सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत गरीब, महिला आणि शेतकऱ्यांबद्दल सरकारचं व्हिजन काय या संदर्भात मुख्यमंत्री बोलतील असं वाटत होतं. पण, मुख्यमंत्र्यांनी टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही,’ अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्यातील ठाकरे सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं सरकारच्या कारभाराचा पाढा वाचवण्यासाठी राज्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं . देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. कोरोना संकट, वाढीव वीज बील, शेतकऱ्यांना मदत या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे.
‘राज्य सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या कार्यकाळाची प्रगती पुस्तिका म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले दोन निकाल आहेत. सरकारी यंत्रणांचा मोठा गैरवापर केला गेला. हे दोन निकाल आल्यावर आता कुणावर कारवाई करणार हे आता स्पष्ट झाले पाहिजे. आता न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री माफी मागणार का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. अर्णव गोस्वामी किंवा कंगना यांच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही, पण विरोधी विचारांनी त्यांना चिरडून टाकायचं याच्याशी तर आम्ही बिलकूल सहमत नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपचं हिंदुत्व बदललं नाहीये शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्वाबद्दल बोलताना धोतर सोडल्याची भाषा कसली करतायेत? असा सवाल करतच त्यांनी ‘ज्या पक्षानं वारंवार सावरकरांवर टीका केली आज त्या पक्षासोबत सत्तेत आहात, अशी टीकाही केली आहे