पारोळा प्रतिनिधी । मुख्यमंत्री सौर कृषि योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात काही तालुके वगळता इतर तालुक्यांचा समावेश नाही. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री सौर कृषियोजनेत ऑनलाईन मागणी अर्ज भरतांना जळगांव व धरणगांव हे दोनच तालुके वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांची नावेत येत नाहीत. ह्या दोनच तालुक्यातील शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळत असून जिल्ह्यातील इतर १३ तालुक्यातील या योजनेसाठी गरजू असलेला शेतकरी डावलला जात आहे. या आठवड्यात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषि योजना सुरु झाली आहे. हि योजना खास महाभुधारक म्हणजे पाच एकरावरील शेतकऱ्यांसाठी आहे. अशा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित ७.५ अश्वशक्तीचे (हाँर्सपॉवर) वीजपंप व सौरपॅनल तब्बल ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध होणार आहे. यात फक्त २८२०० रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. बागाईतदार शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय लाभदायक आहे. या योजनेत प्रथम येणाऱ्यास (ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यास) किंबहुना क्रमवारीनुसार व अटीशर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. आता जळगांव जिल्ह्यातील जळगांव व धरणगांव हि दोन तालुके वगळता इतर तेरा तालुक्यांचे नावच ऑनलाईन नोंदणीत येत नसल्याने इतर तालुक्यातील शेतकरी वंचित राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांकडून तिव्र नाराजीचा सुर व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ह्या योजनेची गरज असल्याने फक्त दोनच तालुक्याची नांव या ऑनलाईन प्रणालीत का ? इतर तालुक्यांवर असा अन्याय का ? ह्याच्याने जळगाव व धरणगाव तालुके वगळता इतर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला दिसून येत आहे. तरी सदरील बाब लक्षात घेता जळगांव जिल्ह्यातील जळगांव व धरणगांव तालुक्यासह इतर १३ तालुक्यांतील बळीराजाला याचा लाभ व्हावा. तसेच ह्या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये म्हणून त्वरित मुख्यमंत्री सौर कृषि योजनेच्या ऑनलाईन प्रणालीत जळगांव व धरणगांव तालुक्यासह इतर १३ तालुक्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.