मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने मुख्यमंत्री फेलोशीप बंद करू नये अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी आपल्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंदर्भातील निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. हे पत्र फडणवीस यांनी ट्विटही केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी केली आहे. सध्या कार्यरत असलेल्या फेलोजचा कार्यकाळ जुलै, ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच मार्च महिन्यात त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश जात आहे, असे आपणास प्रकर्षाने वाटते. किमान त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची तरी संधी मिळावी असे मला आवर्जून वाटते, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.