मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुणे दौरा करणार आहेत. यावेळी पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांसंदर्भात बैठक ते घेणार आहेत.
पुण्यात कोरोनाचा वाढत असलेल्या प्रादुर्भावावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सात्यत्याने केला जात आहे. अगदी पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 75 हजारहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली होती. एवढेच नव्हे तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ९ वाजता मुंबईतून पुणे शहराकडे निघतील.