जळगाव (प्रतिनिधी) ‘कोणी राजकारण करावे की नाही करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माणसाला हृदयातून कोणीही डावलू शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा देखील अशीच आहे’, असा चिमटा शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे नाव न घेता काढला आहे. ते खरीप आढावा बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्य पदाच्या नियुक्तीवरून सध्या राज्यात विविध चर्चा सुरू आहेत. तशात आजच केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदची निवडणूक घेण्याची परवानगी दिली आहे. परंतू तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नेमण्याबाबत राज्यपाल यांनी निर्णय न घेतल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप होत होते. याच मुद्द्यावर ना. गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे एकच नेता आहे. तो नेता जे बोलतो, तेच आम्ही पण बोलत असतो. ही बाब माझ्या अखत्यारितील नाही. वरिष्ठ पातळीवरील बाब असल्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी मागणी महाविकास आघाडीची आहे. दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभाला हजेरी लावली. त्यानंतर अजिंठा विश्रामगृहात खरीप आढावा बैठक घेतली.