कोल्हापूर प्रतिनिधी । मुक्ताईनगरमधील भाजपच्या गडाला शिवसेनेने सुरंग लावल्यानंतर भाजपने आता माथेरानमध्ये शिवसेना फोडून याचा हिशोब चुकता केला आहे. माथेरानमधील शिवसेनेच्या उपनगराध्यक्षांसह दहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीतला सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला काल प्रचंड हादरा बसला. पक्षाच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून अजून चार नगरसेवक पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिवसेनेला बहुमत मिळाले आहे. जळगाव महापालिकेच्या पाठोपाठ मुक्ताईनगरात यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
दरम्यान, काल सायंकाळी भाजपच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी आज कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह अन्य नऊ नगरसेवकांचा यात समावेश आहे. यामुळे या माध्यमातून भाजपने शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे.