मुंबईत लोकल रेल्वेच्या ६१० फेऱ्या वाढवणार

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकलमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय आज घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने याबाबत आज संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील विशेष लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या वाढवून आता २०२० करण्यात आली आहे. सध्या एकूण १४१० लोकल फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत होते. त्यात आता ६१० फेऱ्यांची भर घालण्यात आली आहे, असे रेल्वेकडून आज सांगण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावर सध्या ७०६ लोकल फेऱ्या चालवल्या जात असून त्यात ३१४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या १०१० इतकी झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या ७०४ फेऱ्या होत असून त्यात २९६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या आता १००० होणार आहे. राज्यात अनलॉकचा सहावा टप्पा उद्यापासून सुरू होत असून उद्यापासूनच हा वाढीव लोकलफेऱ्यांचा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे.

मुंबई उपनगरीय लोकलबाबत अनेक अफवा वेळोवेळी पसरवल्या जात असतात. ती बाब ध्यानात घेऊन कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. उद्या रविवारचा मेगाब्लॉक आधी जाहीर केल्यानुसार असेल व त्यानुसार लोकल धावतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जे वैद्यकीय व सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत त्याचे प्रवाशांनी काटेकोरपणे पालन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

Protected Content