मी घटनेनुसार काम करतोय, कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही ; राज्यपालांचं प्रत्युत्तर

 

 

नांदेड : वृत्तसंस्था । राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकारण पेटलेलं असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांवर आक्षेप घेतला होता. राज्यपालांकडून राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. त्यावर आता राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणालेत. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलंय.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा आज संपला आहे. नियोजित दौरा आटोपून राज्यपाल मुक्कामासाठी रवाना झाले आहेत. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात राज्यपालांचा मुक्काम असेल. उद्या सकाळी 9 वाजता ते हिंगोलीसाठी रवाना होणार आहेत.

Protected Content