जळगाव,प्रतिनिधी | शहरातील ऑटोरिक्षा विना मीटरच्या धावत आहेत. या रिक्षांना मीटर लावण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता केली होती. यानुसार ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे भाडे आकारणे (घेणे) बंधनकारक असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांनी कळविले आहे.
एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य आहे. ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे. सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑटोरिक्षा फेअरमीटर प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटर प्रमाणे भाडे घ्यावे अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवानाधारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील, तर नागरिकांनी अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२६१८१९ किंवा [email protected] या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी म्हटले आहे.