अमरावती : वृत्तसंस्था । जिल्ह्यात कोरोना काळात निर्बंध असताना मिरवणूक काढणं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांना महागात पडलं आहे. निकम यांच्यासह २५ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या कार्यकाळात एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात निकम यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवत फटाके फोंडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आले. त्यामुळे अमरावती सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात जिल्हा शल्य चिकित्सक निकम यांच्यासह २० ते २५ कर्मचाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ ( ब)व कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून काही प्रमाणात रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. जिल्ह्यात विनापरवानगी विवाह सोहळे व स्वागत समारंभावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निकम यांनी केलेले नियमांचे उल्लंघन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता.
यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दोन दिवसानंतर डॉ. निकम यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोविड नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी असलेल्या डॉ. निकम यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अशाप्रकारे जिल्हा शल्य चिकित्सकांवर गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.