मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील माहुल गावातील प्रदूषणासाठी चार कंपन्यांना तब्बल २८६ कोटी रुपयांचा दंड राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला आहे.
माहुल हे ईशान्य मुंबईतील जुने गाव आहे. या ठिकाणी एजिक लॉजिस्टिक,एचपीसीएल,बीपीसीएल, सी लॉर्ड या चार मोठ्या ऑइल कंपन्यांचे प्रकल्प आहेत. माहूल आणि आंबापाडा गावातील रहिवाशांनी २०१४ मध्ये कंपन्यांविरोधात तक्रार केली होती. आपल्या घरापासून काही मीटर अंतरावर कंपन्यांची युनिट असून श्वसनाचे त्रास झाल्याचे गावकऱ्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार या चारही कंपन्यांना पुढील पाच वर्षात एकूण २८६ कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. यानुसार एजिक लॉजिस्टिक – १४२ कोटी, एचपीसीएल – ७६.५ कोटी, बीपीसीएल – ६७.५ कोटी, सी लॉर्ड – २० लाख अशा रकमेचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच हवेचा दर्जा सुधारण्यासाठी दंडातून रक्कम खर्च करण्यात येणार आहे. कुठल्या कंपनीतून किती अस्थिर सेंद्रिय रसायने बाहेर पडली आणि त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन दंडाची रक्कम ठरवण्यात आली आहे.