जळगाव प्रतिनिधी । मेहरूण परिसरातील मास्टर कॉलनीतून रागाच्या भरात बेपत्ता झालेली १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला एमआयडीसी पोलीसांनी मुंबई पोलीसांकडून ताब्यात घेतले असून मुलीला सुखरूप पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. एमआयडीसी पोलीसांच्या कामगिरीचे पालकांनी आभार मानले.
अधिक माहिती अशी की, अफजल मिया कुदबुद्दीन शेख (वय-५८) रा. मास्टर कॉलनी अक्सा नगर हमालीचे काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा लहान भावाचे आठ वर्षापुर्वी निधन झाल्याने त्यांची मुलगी जिनत फातेमा अफजल मिया शेख ही यांच्याकडे राहते. १६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता दुध घेण्यासाठी जिनत ही घराबाहेर पडली. परिसरातील किराणादुकानावरून दुध घेवून परत न आल्याने तिचा शोधाशोध करण्यास सुरूवात केली. अद्यापपर्यंत मुलगी घरी न आल्याने एमआयडीसी पोलीसांना खबर दिली. अफजल मिया यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीसांनी हालचाली सुरू केल्या. तपासात बेपत्ता झालेली मुलगी ही मुंबई येथे आल्याची माहिती मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनला असल्याची माहिती टमुंबई पोलीसांनी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.ना. मिलिंद सोनवणे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल मालती वाडीले, होमगार्ड धिरज भगत यांना मुंबईला रवाना केले. पथकाने मुंबई पोलीसांकडून खात्री करून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेवून आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. तिची चौकशी केली असता आपण रागाच्या भरात मुंबई येथे निघून गेल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलीला तिची आई शाईनबी अब्दुल अजीज रा. मारूळ ता.यावल यांच्या ताब्यात देण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल मालती वाडील, पो.ना. मिलींद सोनवणे, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. सुधिर साळवे यांनी मुलीला शोधण्यास परिश्रम घेतले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते इक्बाल पिरजादे आणि जिया बागवान यांचे सहकार्य लाभले.