मालेगाव (वृत्तसंस्था) मालेगावात मध्यरात्रीत तब्बल ७१ जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे अक्षरशः हाहा:कार माजला आहे. एकट्या मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५३ वर पोहोचली आहे.
मालेगावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे काल नाशिक दौऱ्यावर होते. ‘मालेगाव शहरात दाट वस्ती आहे. या शहरात होम क्वारंटाईन करणे शक्य नाही. त्यामुळे जिथे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केलेच पाहिजे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. दरम्यान, नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये तीन महिन्याच्या मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आणखी सहा पोलिसांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. दुसरीकडे मालेगावात कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. येथे पोलीस सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे. नागरिक ऐकत नसल्याने पोलीस कुमकही वाढविण्यात आली आहे. मालेगावात सध्या आठशे पोलीस आहे. एसआरपीएफ तुकडया तैनात आहेत. आवश्यकता असल्यास अधिक पोलीस आम्ही पाठवू असे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मालेगावात कुठल्याही परिस्थितीत कुमक कमी पडणार नाही, असे सांगीतले आहे.