एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील मालखेडा येथे दिवसा घरफोडी करून घरातील ७४ हजार रूपये किंमतीचे रोकड व दागिने अज्ञात चोरट्यांनील लांबविल्याची घटना रविवारी उघडकीला आली. कासोदा पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, सुभाष शंकर पाटील (वय-५६) रा. मालखेडा ता. एरंडोल हे तालुक्यातील जावखेडा येथे पत्नीसह १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लग्नासाठी गेले. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते व चावी घराच्या खिडकीजवळ ठेवले होते. सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान अनोळखी तरूणाने खिडकीतील चावीने कुलूप उघडून घरातील ७४ हजार रूपये किंमतीचे रोकड व सोन्याचे दागिने लांबविली. दुपारी २ वाजता दाम्पत्य घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार भागवत पाटील हे करीत आहे.